९५ टक्के सरकारी कर्मचाऱ्यांकडे हरामाची कमाई आहे. असे वादग्रस्त वक्तव्य आमदार संजय गायकवाड यांनी केले होते. संदर्भात आज अर्थसंकल्प अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवारांनी यांनी नाराजी व्यक्त करत संजय गायकवाड यांच्यावर हल्लाबोल केला. काय म्हणाले अजित पवार? एकीकडे अवकाळी पाऊस आणि दुसरीकडे सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप, अशा दुहेरी कात्रीत महाराष्ट्र सापडला आहे. महसुली कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शेतीच्या नुकसानीचे पंचनामे रखडले आहेत. पंचनामे करायला कुणीच नाहीत. अशावेळी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी समंजस भूमिका घेतली पाहीजे. मात्र, सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड हे ९५ टक्के सरकारी कर्मचाऱ्यांकडे हरामाची कमाई आहे. असे वक्तव्य करत आहेत. सत्ताधारी पक्षाचे आमदारच सरकारी कर्मचाऱ्यांबाबत असे वक्तव्य कसे काय करू शकतात? ज्यांच्याकडून आपल्याला कामे करुन घ्यायची आहेत. तेच आमदार नाऊमेद झाले तर राज्य कसे चालणार?, पंचनामे कसे होणार?, गारपिटीने ग्रस्त शेतकऱ्यांना मदत कशी होणार?, असे सवाल अजित पवार यांनी केले.
गारपिटीमुळे शेतीचे आतोनात नुकसान झाले आहे. फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पंचनामे करायलाही कुणी नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी माणुसकीच्या भावनेने ताबडतोब नोकरीला यावे, पंचनामे करावे, असे आवाहन अजित पवारांनी केले. वादळी पावसामुळे मराठवाड्यात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. १०० च्या आसपास पशूधनाचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, कर्मचारीही संपावर आहेत. त्यामुळे सरकारने तातडीने यावर तोडगा काढणे आवश्यक आहे. मात्र, सरकार या मुद्दयांवर गंभीर दिसत नाही. अशावेळी किमान विधानसभा अध्यक्षांनी तरी सरकारला सूचना द्याव्यात. असं विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी म्हणाले.