मुंबई: २५ वर्षांपूर्वी रेल्वेस्थानकावर भीक मागताना एका महिलेने एका मुलीला पाहून तिला मायेचा पाझर फुटला आणि तिने त्या मुलीला स्वतःच्या घरी आणले व पोटच्या मुलीप्रमाणे तिचा सांभाळही केला. वयात आल्यानंतर चांगला मुलगा पाहून तिचे लग्न देखील लावून दिले. मात्र, हीच मुलगी पुढे उपकार विसरली. तिने केवळ एका मोबाईल आणि चेनसाठी त्याच महिलेचा खून केला. ही धक्कादायक घटना मुंबईच्या मालाड परिसरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास करत आरोपी महिला, तिचा पती आणि मुलाला अटक केली आहे. या घटनेनं मालाड परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मोहम्मद उमेर इब्राहिम शेख, शबनम प्रवीण उर्फ मोहम्मद उमेर शेख, मोहम्मद शहजाद उमेर शेख अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मोलकरीण असलेल्या आरोपीचे नाव शबनम असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शबनम ही अनाथ आहे. ती २५ वर्षांपूर्वी रेल्वेस्थानकावर भीक मागत असे. डिकोस्टा यांनी एकदा शबनमला रेल्वेस्थानकावर भीक मागताना पाहिले. अपंग शबनमला पाहून त्यांना तिची दया आली. त्यांनी तिला घरी आणले. घरी काम दिले आणि पालनपोषण केले. पुढे डिकोस्टा यांनी तिचे लग्नही लावून दिले. गेल्या २५ वर्षांपासून शबनम ही डिकोस्टा यांच्या घरी काम करत होती. आपल्या मालकिणीकडे खूप पैसा आहे असे शबनमला नेहमीच वाटायचे. असा विचार करत करत ती मालकिणीचे उपकार विसरून गेली. मालकिणीच्या घरात लूट करण्याचा विचार तिने केला. त्यानंतर तिने पती आणि मुलाच्या मदतीने चोरीचा कट रचला. गुरुवारी दुपारच्या सुमारास डिकोस्टा यांचा नातू कामानिमित्त बाहेर गेला. हीच संधी साधून शबनमने पती आणि मुलाच्या मदतीने मालकिणीला बाथरुमधील पाण्याच्या बादलीत बुडवून मारून टाकले. त्यानंतर तिने मालकिणीची सोन्याची चेन, मोबाइल फोन आणि स्मार्ट वॉच घेऊन पळून गेली.
कामानिमित्त घराबाहेर गेलेला डिकोस्टा यांचा नातू सतत त्यांना फोन करत होता. मात्र त्या उत्तर देत नव्हत्या. मग त्याने शेजारी फोन करून पाहायला सांगितले. त्यानंतर शेजारी महिला डिकोस्टा यांच्या घरी गेली. तेव्हा तिला डिकोस्टा मृत अवस्थेत दिसल्या. तेव्हा त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले. त्यांनी डिकोस्टा यांचा मृतदेह ताब्यात घेत या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी तपास करताना इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा शबनम ही संशयितरित्या इमारतीतून बाहेर पडताना दिसली. पोलिसांनी तातडीने तिला ताब्यात घेऊन तिची कसून चौकशी केली असता, आपणच पती आणि मुलाच्या मदतीने ही हत्या केल्याचं तिने कबुल केलं. यानंतर पोलिसांनी तिघांनाही अटक केली.