सावंतवाडी प्रतिनिधी: आमदार वैभव नाईक यांची सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. आमदार नाईक शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा असल्याने, त्यांची उचलबांगडी करण्यात आली. अशी चर्चा सुरु आहे. याबाबत वैभव नाईक यांनी ABP माझा वर खुलासा केला आहे.
वैभव नाईक म्हणाले, “शिंदे गट आणि भाजपात येण्यासाठी अनेकजण दबाव टाकत आहेत. तरीही दबावाला झुगारून कोणत्याही पक्षात जाणार नाही. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली १५ वर्षे जिल्हाप्रमुख होतो. नव्या कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे. आता जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा काम करत आहे. म्हणून उद्धव ठाकरेंनी जबाबदारी ही काढून घेतली असेल. त्यामुळे शिवसेना वाढवण्यासाठी जे-जे काम करावे लागेल ते करणार आहे,” अशी स्पष्टोक्ती वैभव नाईक यांनी दिली आहे.आमदार वैभव नाईक यांनी सदानंद कदम यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईबद्दल बोलताना सांगितलं की , “सदानंद कदम यांचा ईडीशी काही संबंध नाही. खेडच्या मेळाव्यात सदानंद कदम यांनी बॅनर लावल्याने त्यांच्या कारवाई करण्यात आली. मात्र, किती लोकांवर कारवाई करत अटक करणार, किती दिवस जेलमध्ये टाकणार हा प्रश्न आहे. या कारवाईनंतर जनता आपला रोष व्यक्त करेल, म्हणून ही लोक निवडणुकीपासून लांब पळत आहे. असेही वैभव नाईक यांनी म्हटलं.