Home स्टोरी आजच्या दिवसाची सुरुवात चांगल्या विचारानी! जय जय रघुवीर समर्थ! श्लोक क्रमांक ६...

आजच्या दिवसाची सुरुवात चांगल्या विचारानी! जय जय रघुवीर समर्थ! श्लोक क्रमांक ६ आणि अर्थ.

54

नको रे मना क्रोध हा खेदकारी,

नको रे मना काम नाना विकारी,

नको रे मना सर्वदा अंगिकारू,

नको रे मना मत्सरू दंभभारू ||६||

अर्थ: मना, क्रोध, जो खेदकारक असतो आणि कामा, वासना, ही नाना प्रकारे विकारी असते त्यांचा अंगीकार करू नकोस आणि मत्सर, भोंदूगिरी यांना देखील जवळ करू नकोस. समर्थ या श्लोकात सांगताहेत, हे मना, क्रोध हा खेदकारक असतो. अति क्रोध केल्याने माणसाच्या हातून अविचारी, आततायी कृत्ये घडण्याची शक्यता असते आणि अशा अविचारी कृत्यांचा अंतिम परिणाम खेदजनक होतो. तसेच काम, म्हणजे अभिलाषा हीदेखील विकारी म्हणजे मनाची चलबिचल वाढवणारी असते. अर्थात क्रोधापासून किंवा कुठल्याही गोष्टीची इच्छा, अभिलाषा धरण्यापासून मनुष्यप्राण्याला संपूर्णपणे आणि नेहमीच सुटका मिळणे अशक्यप्राय असते. किंबहुना थोड्या प्रमाणात या भावना स्वाभाविक आहेत. फक्त हे मना, या भावनांचा सदासर्वदा, म्हणजे अगदी पदोपदी अंगिकार करू नये. कारण गीतेत सांगितल्याप्रमाणे विचार मनि जो करि विषयाचा‚ होई आधीन | आधिनता मग जने वासना‚ राग वासनेतून || रागातुन जन्मतो मोह जो करी स्मरणऱ्हास | विस्मरणाने बुध्दि फिरे‚ तदनंतर हो नाश || समर्थ याच्यापुढे सांगतात की, मत्सर, हेवा, दंभ म्हणजे ढोंग हे देखील अंती नुकसानकारक असतात. म्हणून ते कधीही मनात जोपासू नये.