मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे, जनी निंद्य ते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्य ते सर्व भावें करावे ||२||
अर्थ: हे सज्जन मना, नेहमी भक्तिमार्गाने गेले म्हणजे साहजिकच परमेश्वर पावतो. तेव्हा लोकांकडून ज्याची ज्याची निंदा होईल असे सर्व काही सोडून द्यावे आणि लोकाना जे जे वंदनीय आहे ते सर्व भक्तिभावाने करावे. या मार्गावर जाताना, हे सज्जन मना, तुला कोणती पथ्ये पाळावयाची आहेत ? तर तू नेहमी ईश्वराची भक्ती करायला हवी म्हणजे स्वत: ईश्वर प्रसन्न होईल. इथे समर्थ मनाला सज्जन म्हणून संबोधत आहेत. म्हणजे काय? जर मन मुळातच सज्जन असेल तर त्याला चांगल्या वर्तणुकीचा उपदेश कशासाठी? तर हे सज्जन माणसा, तू नेहमी ईश्वराची भक्ति करीत रहा. म्हणजे स्वत: श्रीहरी, ईश्वर तुला नक्की प्रसन्न होईल आणि नेहमीच्या आचरणात, वागण्यात तू जी जी वर्तणूक निंदनीय असेल तिचा त्याग करून जी जी चांगली, सर्वांकडून नावाजली जाईल अशी वर्तणूक असेल तीच अगदी प्रामाणिकपणे, मनोभावे ठेव.