सावंतवाडी : संस्थानकालीन आकेरी किल्ला अथीत भुईकोट भुईसपाट झाला असून केवळ अवशेषरुपात शिल्लक आहे. त्यामुळे त्याच्या संवर्धनासाठी दुर्ग मावळा प्रतिष्ठानने पुढाकार घेतला असून दि. २६ फेब्रुवारीला आकेरी किल्ला अर्थात भुईकोट संवर्धन मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील काही किल्ले आज काळाच्या उदरात नष्ट झाले असून काही किल्ल्यांचे अवशेष केवळ नावापुरते अर्थात इतिहासाच्या पानातच उरले आहे. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कुडाळ तालुक्यात असलेला आणि सावंतवाडी येथून अवघ्या सात किलोमीटर अंतरावरील आकेरी किल्ला भुईकोट प्रसिद्ध रामेश्वर मंदिराच्या उजव्या बाजूस काही अंतरावर आहे. या किल्ल्याची साधारण ५ फूट उंचीची व १०० ते १५० फूट लांबीची उद्धवस्त तटबंदी आणि या तटबंदीतील दोन बुरुज पाहायला मिळतात. तटबंदीचा आतील भाग ढिगाऱ्यात रुपांतरित झाला असून बाहेरील बाजूने हे बांधकाम व बुरुज दिसून येतात. तटबंदीच्या बाहेरील बाजूस असलेला खंदक माती भरून बुजलेला आहे. किल्ल्याचे इतर कोणतेही अवशेष आता शिल्लक नाहीत. त्यामुळे आता या किल्ल्याच्या संवर्धनासाठी दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागयांच्या वतीने आयोजित केली आहे. सकाळी आठ वाजता मोहिमेला प्रारंभ होणार आहे.