सावंतवाडी: आंबोली येथील हिरण्यकेशी परिसरात अनधिकृतपणे उभारण्यात आलेले “ते” २७ बंगले प्रशासनाकडून सकाळी जमीनदोस्त करण्यात आले. ६ जेसीबींच्या सहाय्याने हे पाडकाम करण्यात आले. या कारवाई विषयी प्रशासनाकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. विशेष म्हणजे त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे भ्रमणध्वनी काह्यात करण्यात आले होते. आता परिसरात असलेल्या अन्य बांधकामांना नोटीसा बजावण्यात येणार असून त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे वन अधिकारी सौ. विद्या घोडके यांनी सांगितले.
आंबोली हिरण्यकेशी परिसरात सर्वे नंबर २३ मध्ये उभारण्यात आलेल्या २७ बंगल्यावर कारवाई करण्याची मागणी तेथे स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात आली होती. त्यासाठी तब्बल २० दिवस ग्रामस्थांनी त्या ठिकाणी आंदोलन केले होते. त्यानंतर स्थानिकांचा वाढता दबाव लक्षात घेता या ठिकाणी प्रशासनाकडून ते बंगले पाडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आज सकाळी ७ वाजल्यापासून या कारवाईला सुरुवात करण्यात आली. यावेळी ६ जेसीबी आणून परिसरात पाडकाम करण्यात आले. दुपारी दीड वाजेपर्यंत सर्व बंगले जमीनदोस्त करण्यात आले, तसेच त्या ठिकाणी बंगल्यासाठी वापरण्यात आलेल्या पत्रे, लोखंडी अँगल तसेच साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई करण्यासाठी सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील, वनविभागाचे सहायक उपवनसंरक्षक लाड यांच्यासह वन अधिकारी मदन क्षिरसागर यांची टीम त्या ठिकाणी ठाण मांडून बसली होती, कारवाई करताना कोणताही दबाव येऊ नये यासाठी परिसरात सर्वांना अटकाव करण्यात आला होता. विशेषतः हिरण्यकेशी परिसरात जाणार रस्ता बंद करण्यात आला होता. तर त्या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांना हिरण्यकेशी फाटा परिसरात आणून बसविण्यात आले होते. दुपारी दीड वाजेपर्यंत ही कारवाई पूर्ण करण्यात आली. त्या ठिकाणी असलेले सर्व बंगले जमीनदोस्त करण्यात आले, असा दावा तहसीलदार पाटील यांनी केला.
ही कारवाई पूर्ण झाल्याची माहीती मिळाल्यानंतर आंबोली ग्रामस्थांनी जल्लोष केला. हा सर्व ग्रामस्थांच्या एकजुटीचा विजय आहे असे सांगून त्यांनी कारवाई करणाऱ्या प्रशासनाचे आभार मानले. यावेळी त्याच परिसरात असलेल्या अन्य बेकायदा बांधकामावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली. त्यानुसार संबंधित बांधकाम करणाऱ्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांच्यावरही लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याचे घोडगे यांनी सांगितले.