Home क्राईम आंबोलीतील पकडलेल्या शिकारीच्या गुन्ह्यातील आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला, चौदा दिवसांसाठी कारागृहात रवानगी..!

आंबोलीतील पकडलेल्या शिकारीच्या गुन्ह्यातील आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला, चौदा दिवसांसाठी कारागृहात रवानगी..!

702

शिकारीसाठी बंदुक देणारा बांद्याचा अल्ताप आगा देखील सहआरोपी.

सावंतवाडी: आंबोली येथे वन्यप्राण्यांची शिकार केल्याप्रकरणी दिनांक १८ फेब्रुवारी रोजी इनोव्हा कारसह ताब्यात घेण्यात आलेल्या सहा आरोपींचा सावंतवाडी न्यायालयाने जामीन नामंजूर करून त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. गुन्ह्यात अटक आरोपी फरान समीर राजगुरू (वय २६), नेल्सन इज्माईल फर्नाडिस (वय ४२) दोघे (रा. सालईवाडा-सावंतवाडी), बाबुराव बाळकृष्ण तेली (वय ४२, रा. सावंतवाडी जेलच्या मागे), सर्फराज बाबर खान (वय ३४), रजा गुलजार खान (वय २३) दोघे (रा. बांदा गडगेवाडी), अरबाज नजीर मकानदार (वय २६, रा. माठेवाडा) आदींचा समावेश आहे. यातील फरहान हा पेशाने वकील असुन या सर्वांवर वन्यजीव संरक्षण अधिनियम-१९७२ नुसार तसेच मनाई आदेश असताना हत्यारे घेऊन फिरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यासोबतच सदर शिकारीसाठी वापरलेल्या बंदुकीचा परवाना धारक अल्ताप आगा, वय-४० वर्षे, रा.-बांदा याला देखील शिकारीच्या गुन्ह्यामध्ये सह आरोपी करण्यात आले. जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या शेतीसंरक्षक बंदुक परवाण्यातील बंदुकांचा शिकारीसारख्या अवैध कृत्यांसाठी गैरवापर करणाऱ्यांवर वन विभामार्फत तसेच पोलिस विभागाची मदत घेऊन कठोरात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे उपवनसंरक्षक सावंतवाडी श्री. एस नवकिशोर रेड्डी यांनी सांगितले. तसेच कुणी बंदुकांचा शिकरीसाठी असा गैरवापर करत असल्यास त्याबाबत बातमी देऊन वन विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

सदरची कारवाई ही उपवनसंरक्षक सावंतवाडी श्री. एस नवकिशोर रेड्डी, विभागीय वन अधिकारी(दक्षता), कोल्हापूर श्री. दिलीप भुरके, सहाय्यक वनसंरक्षक डॉ. सुनिल लाड यांचे मार्गदर्शनाखाली, वनक्षेत्रपाल आंबोली सौ. विद्या घोडके, फिरतेपथक वनक्षेत्रपाल मदन क्षिरसागर, वनपाल सौ. पूनम घाटगे, पोलीस हवालदार गौरेश राणे, वनरक्षक प्रमोद जगताप, पांडुरंग गाडेकर यांनी यशस्वीरित्या पार पाडली.