कोल्हापूर प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी एसटी स्थानकातून १५ जानेवारी रोजी सकाळी सावंतवाडी- पुणे एसटी बस तब्बल दोन तास उशिरा धावली होती. ही एसटी बस हाती घेण्यास चालक राजी नव्हता. सदर चालक हा आजारी असल्यामुळे आपण एसटी बस लांब पल्याची हाकू शकत नाही. असा निर्वाळ त्याने दिला होता. असे असताना सावंतवाडी एसटी आगारा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदरचालकाला सक्तीने सावंतवाडी पुणे एसटी बस हाकण्यास सांगितले. पण कोल्हापूर येथे ही बस स्थानकात येताच सदर चालक श्री मुळीक याला अस्वस्थ वाटू लागल्याने, त्याला तात्काळ कोल्हापूर येथील जिल्हा रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ताण-तणावाखाली असल्यामुळेच त्याला अस्वस्थ वाटू लागले आहे. त्याला चार दिवस रुग्णालयाच्या नियंत्रणाखाली ठेवण्यात आले आहे. खरंतर सावंतवाडी स्थानकातून ही बस सुटतानाच सदरचालकाने आपल्याला शक्य नाही असे सांगूनही अधिकारी वर्गाने त्याच्यावर दबाव टाकून त्याला एसटी बस हाकायला लावली. मात्र चालकाकडून एसटी चे स्टेरिंग घेण्यापूर्वी त्याच्याकडून लेखी लिहूनही घेतले होते. त्यावेळी त्याने आपण बरे नसल्याने ड्युटी करत नाही. असे स्पष्ट केले होते. लेखी लिहून चालकाने देऊन सुद्धा एसटी स्थानकातील अधिकारी यांनी प्रवाशांचा जीव धोक्यात घालून त्याला कसे काय ड्युटीवर पाठवले? असा सवाल आता व्यक्त होत आहे.
या बस मध्ये जवळपास ३५ ते ४० प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने कोल्हापूर स्थानकात सदरचालकाला अस्वस्थ वाटू लागले. मात्र त्याला वाटेत कुठे असे झाले असते तर मोठा अनर्थ घडला असता. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.