नाशिक: गेल्या अनेक दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. या अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे महाराष्ट्रातील द्राक्ष, कांदा ,आंबा, गहू, भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेतीमालाला भाव नाही. खत औषधांच्या किमती गगनाला भिडल्या आहे. अशा काळात कसं बसं पीक शेतकऱ्यांनी उभं केलं होतं. परंतु हाता- तोंडाशी आलेलं पीक अवकाळी पावसाने आणि गारपिटीने जमिनदोस्त झालं आहे. यामुळे महाराष्ट्रातले सर्व शेतकरी हवालदिल झालेत.या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करणे सरकारने अपेक्षित आहे.
छत्रपती शिवरायांचे नाव घेऊन शिंदे सरकार सत्ताकारण करते. शिवरायांनी त्यांच्या स्वराज्यात जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा अधिकाऱ्यांना पत्र लिहून सर्व शेतकऱ्यांचे कर्ज वसूल थांबवणे .व्याज माफ करणे व मोफत बी बियाणं देणं अशा पद्धतीच्या सूचना आज्ञापत्रातून दिल्या होत्या. त्याच शिवरायांचा आदर्श आजच्या मुख्यमंत्र्यांनी घ्यावा व शेतकऱ्यांना पंचनाम्याची वेळ काढू प्रक्रियेत न अडकवता पाऊस आणि गारपीट झालेल्या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना तात्काळ भरीव मदत करावी व त्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करावे अशी मागणी पत्र लिहून स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
प्रतिक्रिया- गेल्या तीन-चार वर्षांपासून शेतकऱ्यांची जी दुरावस्था झाली त्यामुळे शेती करण्याचा आत्मविश्वासच केवळ शेतकऱ्यांचा कमी झाला नाही तर बहुसंख्य शेतकरी हे आत्महत्येच्या वाटेवरती उभे आहे. यामुळे इतर सर्व गोष्टी बाजूला ठेवून अन्नदात्याला मदत करणं शिंदे सरकार कडून अपेक्षित आहे. छत्रपती शिवरायांचा आदर्श केवळ भाषणांपुरताच न ठेवता तो कृतीत आणावा व संपूर्ण शेतकऱ्यांना तात्काळ मदत करून दिलासा द्यावा. तसेच सर्व शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करून पुढील हंगामासाठी त्यांना नवीन पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे ही आमची प्रमुख मागणी आहे.
श्री संदीप जगताप प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना