अमृता फडणवीस यांनी एका डिझायनर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. डिझायरने अमृता फडणवीसांना १ कोटींची लाच ऑफर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्या तक्रारीनंतर मलबार हिल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखला करण्यात आला असून डिझायनर अनीक्षाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
अमृता फडणवीस या शुद्ध आणि पवित्र आहेत. त्यांचे बोलणे हा त्यांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा विषय आहे. पण एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न करणारे तुमच्या स्वयंपाक घरापर्यंत पोहोचले. जरी अमृतावहिनींनी यासंदर्भात आता एफआयआर दाखल केला असला तरी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी. कारण हे प्रकरण गंभीर आहे. अशी प्रतिक्रिया ठाकरे गटानं सामना अग्रलेखातून दिली आहे. दरम्यान, सामना अग्रलेखातून या प्रकरणावरुन फडणवीसांवर निशाणा साधला आहे. ‘या प्रकरणातील जे कोणी लाच देण्याचा प्रयत्न करणारे आहेत त्यांची हे करण्याची हिंमत झालीच कशी? म्हणजेच या राज्यात सर्वकाही पैशानेच साध्य होते व ‘लाच’ हाच परवलीचा शब्द झाला आहे. ‘ लाच’ देणे व घेणे यात गैर वाटत नाही अशी महाराष्ट्राची प्रतिमा झाली आहे व त्यामुळेच हे राज्य भविष्यात संतसज्जनांचे राहील काय, असा प्रश्न पडतो. गौतम अदानी यांच्या भ्रष्टाचारावर, दरोडेखोरीवर महाराष्ट्राचे सरकार गप्प आहे. ‘एलआयसी’चे मुख्यालय मुंबईत मंत्रालयासमोर आहे.अदानीच्या नादी लागून एलआयसीने जनतेच्या पैशाची लूट केली व आता विरोधकांनी ‘एलआयसी’च्या दरोडेखोरीवर आक्षेप घेतला म्हणून ‘योगक्षेम’सुद्धा मुंबईतून हलवला जाईल. या राज्यात सध्या काहीही घडू शकते. कायद्याचे राज्य साफ कोसळले आहे. ते असेच कोसळत राहिले तर महाराष्ट्र कोसळेल व महाराष्ट्राच्या प्रतिमेस तडेच तडे जातील. त्यास सुरुवात झाली आहे. असा इशाराही सामना अग्रलेखातून दिला आहे.