Home क्राईम अतिक अहमद आणि अशरफ यांच्या हत्येबाबत विशेष अपडेट्स!

अतिक अहमद आणि अशरफ यांच्या हत्येबाबत विशेष अपडेट्स!

148

उत्तर प्रदेशातील उमेश पाल हत्याकांडातील मुख्य आरोपी माफिया डॉन अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या हत्येने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. उमेश पाल हत्याकांडातील हे दोन्ही आरोपी पोलीस कस्टडीत असतांनाच तिघांनी गोळ्या झाडून त्यांचा खून केला आहे. याप्रकरणी प्रयागराज धुमनगंज पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या एफआयआरमध्ये उमेश पाल हत्याकांडातील आरोपी अतिक अहमद आणि अशरफ अहमद यांना तुरुंगातून आणल्यापासून ते त्यांचा मृत्यूपर्यंतची माहिती दिली आहे.

हात्येतील आरोपी

FIR मध्ये नोंद केलेल्या घटनेची माहिती! या एफआयआरमध्ये सांगण्यात आलं आहे की, १४ एप्रिलला व्यवस्थित चौकशी न झाल्याने १५ एप्रिल रोजी दोन्ही आरोपींची सविस्तर चौकशी करण्यात आली. दोन्ही आरोपींच्या खुणा असलेल्या पाकिस्तानी ऑर्डिनंन्स फॅक्ट्रीच्या वेगवेगळ्या बोअरची ९ मिमीची पाच काडतुसं, ४५ बोअरची एक पिस्तूल, ३२ बोअरची एक पिस्तूल, ५८ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. देशात प्रतिबंधित बोअरची काडतुसं सापडल्याचं या FIR मध्ये नमुद करण्यात आलं आहे. जप्त केलेले पिस्तूल आणि काडतुसं उमेश पाल आणि त्याच्या साथीदारांच्या हत्येसाठी वापरण्यात आली होती, असंहीFIR मध्ये नमुद आहे. १५ एप्रिल रोजी आरोपी अतिक अहमद आणि अशरफ यांच्याविरुद्ध कलम ३/२५/२७/३५ आर्म्स अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. १५ एप्रिलच्या संध्याकाळी दोन्ही आरोपींनी सांगितले की त्यांना खूप अस्वस्थ वाटत आहे. त्यामुळे त्यांना वैद्यकीय उपचारांसाठी निरीक्षक राजेशकुमार मौर्य, उपनिरीक्षक विजय सिंह, उपनिरीक्षक सौरभ पांडे, उपनिरीक्षक सुभाष सिंह, उपनिरीक्षक विवेककुमार सिंह, उपनिरीक्षक प्रदीप पांडे, उपनिरीक्षक विपीन यादव, उपनिरीक्षक शिवप्रसाद वर्मा, हेडकॉन्स्टेबल विजय शंकर आणि कॉन्स्टेबल सुजित यादव, गोविंद कुशवाह, दिनेश कुमार, धनंजय शर्मा, राजेश कुमार, रवींद्र सिंग, संजय कुमार प्रजापती, जयेश कुमार, हरि मोहन आणि मान सिंह यांच्या सोबत बोलेरो गाडीतून रात्री १०: १९ वाजता रुग्णालयात पाठवण्यात आले.

रिझर्व्ह ड्रायव्हर महावीर सिंग गाडी चालवत होते. अतिक अहमद आणि अशरफ यांना मोतीलाल नेहरू मंडल रुग्णालयात पाठवण्यात आले. या ताफ्यासोबत एक सरकारी जीपही होती. रात्री १०: ३५ वाजता पोलिसांचं पथक अतिक आणि अशरफसह मोतीलाल नेहरू मंडल रुग्णालयात पोहोचलं. रुग्णालयाच्या गेटवर वाहन पार्क केल्यानंतर सर्व पोलीस कर्मचारी अतिक आणि अशरफ यांना रुग्णालयाच्या दिशेने घेऊन जात होते. वाहनांच्या सुरक्षेसाठी चालक महावीर सिंग आणि सतेंद्र कुमार यांना सांगण्यात आलं होतं. रुग्णालयाच्या गेटपासून १०-१५ पावलं पुढे गेल्यावर प्रसारमाध्यमांच्या कर्मचाऱ्यांचा जमाव त्यांचे कॅमेरे आणि माईक घेऊन अतिक आणि अशरफचे बाईट आणि फोटो-व्हिडिओ घेण्यासाठी जमा झाले.

सुरक्षा कठडे तोडून मीडिया कर्मचारी अतिक आणि अशरफच्या जवळ पोहोचले. मीडिया कर्मचार्‍यांना पाहून दोघेही बाईट देण्यासाठी थांबले. यावेळी पोलीस पथक त्यांना पुढे चालत राहण्यास सांगत होते. दरम्यान, माध्यम कर्मचाऱ्यांच्या जमावातून दोघांनी त्यांचा माईक आणि आयडी खाली फेकून दिला. त्यानंतर त्यांनी शस्त्रं काढली व अतिक आणि अशरफ यांना लक्ष्य करत थेट गोळीबार सुरू केला.

त्यांच्याकडे अत्याधुनिक सेमी ऑटोमॅटिक शस्त्रं होती. गोळीबारा घटनेदरम्यान मीडिया कर्मचाऱ्यांमध्ये असलेल्या तिसऱ्या व्यक्तीने अतिक आणि अशरफ यांच्यावर गोळीबार करण्यास सुरुवात केली. कोणाला काही समजण्याआधीच प्रसारमाध्यम कर्मचाऱ्यांच्या वेशात आलेल्या तिघा मारेकऱ्यांनी अतिक आणि अशरफ यांच्यावर गोळ्या झाडल्या. या गोळीबाराच्या हल्ल्यात कॉन्स्टेबल मानसिंग यांच्या उजव्या हाताला गोळी लागली. गोळीबारादरम्यान पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तीन हल्लेखोरांना शस्त्रांसह घटनास्थळीच पकडले. हल्लेखोरांना पळून जाण्याची संधी मिळाली नाही. तर हल्लेखोरांच्या क्रॉस फायरिंगमध्ये त्यांचाच एक साथीदारही जखमी झाला आहे. हल्लेखोरांच्या गोळ्या लागल्याने गंभीर जखमी झालेल्या अतिक आणि अशरफ यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. हल्लेखोरांना रंगेहाथ पकडण्यात आले. पोलिसांनी तात्काळ तिघांना पकडले आणि त्यांच्या हातातील शस्त्रे हिसकावून घेतली. घटनास्थळी मीडियाच्या कॅमेऱ्यांनी टिपलेली ही तिच शस्त्रं होती. गोळीबारादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत काही पत्रकारही जखमी झाले आहेत. सेलो टेपने घटनास्थळ सुरक्षित केल्यानंतर फील्ड युनिटने फॉरेन्सिक तपासणी केली आहे.

हत्येचे घटनास्थळ

कॉन्स्टेबल मानसिंग यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे! घटनास्थळावरून पकडलेल्या सर्व गुन्हेगारांची ओळख पटली आहे. एकाने आपले नाव लवलेश तिवारी, पुत्र यज्ञकुमार तिवारी, रा. केवत्रा क्रॉसिंग, ठाणे कोतवाली, बांदा, वय २२ वर्षे असे सांगितले. दुसर्‍याने आपले नाव मोहित उर्फ सनी, पुत्र दिवंगत जगत सिंग, रा/ओ कुरारा, ठाणे कुरारा, जिल्हा हमीरपूर, वय २३ वर्षे असे दिले आहे. तिसर्‍या आरोपीने आपले नाव अरुण कुमार मौर्य, पुत्र दीपक कुमार यांचा मुलगा, कटार बारी, पोलिस स्टेशन सोरॉन, जिल्हा कासगंज, वय १८ वर्षे असे सांगितले आहे. या हत्येमागचा हेतू विचारला असता, तिन्ही आरोपींना अतिक अहमद टोळीला संपवून राज्यात आपले नाव गाजवायचे असल्याचं सांगितलं. भविष्यात त्याचा नक्कीच फायदा मिळाला असता. पोलिसांच्या पहाऱ्याचा आम्हाला अंदाज आला नाही आणि हत्येनंतर पळून जाण्यात आम्ही अयशस्वी ठरलो, असं मारेकऱ्यांनी सांगितले.

एफआयआरमध्ये अतिक आणि अशरफच्या मारेकऱ्यांच्या हवाल्याने नमुद करण्यात आले आहे की, पोलिसांनी केलेल्या तात्काळ कारवाईमुळे आम्ही पकडले गेलो. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, अतिक आणि अरशफ यांच्या पोलिस कोठडीची माहिती मिळाल्यापासून आम्ही मीडिया कर्मचाऱ्याच्या वेशात येथील स्थानिक मीडिया कर्मचाऱ्यांच्या गर्दीत राहत होतो. दोघांनाही मारण्याच्या प्रयत्नात आम्ही होतो, पण योग्य वेळ आणि संधी सापडत नव्हती. संधी मिळताच आम्ही ही घटना घडवून आणली.

हत्या होतांनाचे छायाचित्र (संग्रहित फोटो)

या घटनेनंतर घटनास्थळी मोठा जमाव जमला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा फौजफाटाही मोठ्या प्रमाणात घटनास्थळी पोहोचला. ही घटना प्रसारमाध्यमांसह इतर लोकांनीही पाहिली. क्रॉस फायरिंगमध्ये आरोपी लवलेशला गोळी लागली. त्याच्यावर स्वरूप राणी वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.