Home स्टोरी अक्कलकोट वटवृक्ष मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा मोठया भक्तीभावात साजरी…!

अक्कलकोट वटवृक्ष मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा मोठया भक्तीभावात साजरी…!

144

हजारो स्वामी भक्त स्वामी चरणी नतमस्तक….!

 

मसुरे प्रतिनिधी:

 

अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा मोठया भक्तीभावात व उत्साहात साजरी झाली. त्रिपुरारी पौर्णिमेस श्री वटवृक्ष मंदिरात अनन्य साधारण असे महत्व आहे. या पौर्णिमेस महाराष्ट्र राज्याच्या काना कोपऱ्यातून आलेल्या हजारो स्वामी भक्तांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.

 

पौर्णिमेनिमित्त पहाटे ५ वाजता पुरोहीत मंदार व मोहनराव पुजारी यांच्या हस्ते चेअरमन महेश इंगळे यांच्या उपस्थितीत स्वामींची काकड आरती संपन्न झाली.

तदनंतर स्वामी भक्तांच्या दर्शनाकरिता मंदिर खुले करण्यात आले. स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होणेकरिता नित्यनियमाने होणारे अभिषेक आज बंद ठेवण्यात आले होते. सकाळी साडे अकरा वाजता देवस्थानच्या वतीने श्रींना महानैवेद्य दाखविण्यात आले.

स्वामींच्या पालखीसह परगावाहून पायी चालत निघालेले स्वामीभक्त व अन्य स्वामीभक्त आज स्वामींच्या चरणी नतमस्तक झाले. पुणे, दौंड, मालेगाव, मसले चौधरी, बार्शी, उस्मानाबाद, जेजुरी, सोलापूर, मुंबई इत्यादी ठिकाणांहून दिंडी व पालखी सोबत हजारो पदयात्री स्वामीभक्त श्रींच्या दर्शनाकरिता आले होते. या प्रसंगी मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी आलेल्या दिंडी व पालखीचे स्वागत व पूजन केले. तदनंतर या दिंडीसोबत आलेल्या हजारो स्वामी भक्तांनी देवस्थान भक्त निवास येथे महाप्रसादाचा लाभ घेतला.सर्व भाविकांची महाप्रसादाची सोय वटवृक्ष देवस्थानच्या वतीने करण्यात आली होती. सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होऊन कोणतेही अनुचित प्रकार घडू नये याकरिता समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख नियोजन करण्यात आले होते. सर्व भाविकांना शिस्तबद्ध स्वामींचे दर्शन व्हावे या करीता पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली आलेले पोलीस कर्मचारी व समितीचे सर्व सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले. येणारा भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी वटवृक्ष मंदिराच्या दक्षिण महाद्वार लगत भव्य कापडी मंडप उभारण्यात आले होते. भाविकांना मार्गदर्शन करण्याकरिता पोलीस बंदोबस्त व देवस्थानचे कर्मचारी सेवेकरी तैनात होते. वृद्ध व विकलांग भाविकांना स्वतंत्र व्हीलचेअर वरून दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. पौर्णिमेनिमित्त वटवृक्ष मंदिर गाभारा मंडपास आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. हे सजावट सर्व स्वामी भक्तांचे लक्ष वेधून घेत होते. दिवसभरात हजारो स्वामी भक्तांनी श्रींचे दर्शन घेतले. सायंकाळी ७ वाजता कार्तिक दिवा लावून हजारो दिव्यांच्या दीपप्रज्वलनाने दीपोत्सव साजरा होवून त्रिपुरारी पौर्णिमेची सांगता होईल. याप्रसंगी समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, उज्वलाताई सरदेशमुख, दयानंद हिरेमठ, प्रा. शिवशरण अचलेर, गिरीश पवार, सागर गोंडाळ, श्रीशैल गवंडी, प्रसाद सोनार, मनोज जाधव, महेश मस्कले, आदींसह देवस्थानचे अन्य कर्मचारी, सेवेकरी उपस्थित होते.